राजेश भिसे/जालना : जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेतृत्व विविध निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांत नाराजीचा सूर आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे आपले गा-हाणे मांडून तिढा सोडविण्याची मागणी केली आहे. यावर आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एक वर्षापूर्वी जालना नगर पालिकेची निवडणूक झाली. यात निवडणूकपूर्व काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आघाडी झाल्यानंतर निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात आले. नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्यात आले. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. यात काँग्रेसची सरशी झाली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसने २८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ९ जागांवर यश मिळविले. पक्षीय बलाबलानुसार पालिकेत आघाडीने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करून सत्तेत आघाडीच्या नियमानुसार वाटा देण्यात आला. उपनगराध्यक्षपदासह दोन सभापती पदे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. सत्तेत वाटा मिळाला असला तरी विविध योजनांची कामे, महत्त्वाचे निर्णय आणि ठराव घेताना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांना आहे. काँग्रेसचे नेते अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पदाधिका-यांमध्ये आहे. विशेष म्हणजे याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतेही लक्ष देत नसल्याने यात अधिकच भर पडत आहे. आघाडी असली तरी पालिकेत केवळ काँग्रेसचीच सत्ता असल्याचे भासवले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना काँग्रेसचे नेते फूस लावत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हा राजकीय तिढा लवकरच सोडवावा लागणार आहे. अन्यथा पक्षवाढीस मर्यादा येऊन पक्षाची शक्ती क्षीण होण्याची चिन्हे आहेत..................................उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, पण....शहरात पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता असून, यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जावेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची भूमिका आहे. याकडे काँग्रेसचे नेतृत्व लक्ष देत नसल्याचा या पदाधिका-यांचा आरोप आहे. काँग्रेस नेतृत्वाने कामांची विभागणी करून राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना कामांचे वाटप करावे, असे मत नाव न छापण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले................................पालिकेचा कारभार करताना सहकारी पक्षाला नेहमीच विश्वासात घेतले जात आहे. काही गैरसमज असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा करुन दूर केले जातील. आघाडी म्हणूनच पालिकेचा कारभार केला जाईल.- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, काँग्रेस...................................काँग्रेस नेत्यांशी काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा झाली असून, आघाडीच्या बोलणीनुसार पालिकेचा कारभार करण्याबाबत चर्चा झाली आहे. गैरसमज दूर करुन सत्तेतील वाटा आणि त्यानुसार अधिकार पक्षाच्या पालिकेतील सदस्यांना मिळवून दिले जातील.- आ. राजेश टोपे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, जालना....................................राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सकारात्मक भूमिका ठेवून काँग्रेसला सहकार्य केले आहे. मात्र, विकासकामांचे नियोजन, योजनांची अंमलबजावणी आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही. ते घेतले जावे.- राजेश राऊत, उपनगराध्यक्ष, जालना .
जालना नगर पालिकेत आघाडीत विसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:24 AM