जालना/ वडीगोद्री : एक मराठा लाख, मराठा, जय भवानी जय शिवाजी, लढेंगे और जितेंगे, हम सब जरांगे, अशा एक ना अनेक घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असंख्य मराठा समाज बांधव, महिला, युवकांनी शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहे. मनोज जरांगे पाटील हे शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना भावूक झाले होते. गळ्यात कवड्याची माळ, भगवा रुमाल, पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेल्या जरांगे पाटील यांनी सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विविध घोषणा देत अंतरवाली सराटी येथून पायी रॅली मुंबईच्या दिशेने निघाली. अंतरवाली सराटी येथील महिलांनी मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाल्याने महिलांच्याही डोळ्यात पाणी आले. जरांगे पाटलांसह असंख्य मराठा बांधव व महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत.
रॅली भगवीमयछत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा, मराठा बांधवाच्या डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे होते. मराठा आंदोलक विविध घोषणा देत असल्याने महामार्ग व परिसर दणाणून गेला होता.
वडीगोद्रीत महिलांकडून पुष्पवृष्टीमनोज जरांगे पाटील यांची पदयात्रत्त वडीगोद्री येथे आली असता महिलांनी पुष्पवृष्टी करीत जरांगे पाटील यांचे औक्षण केले. यावेळी धुळे- सोलापूर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.