लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. विषय समित्यांच्या सभापतीपदी परसुवाले सईदाबी अब्दुल रूऊफ, अयोध्या चव्हाण, प्रभा गायकवाड, पूजा सपाटे यांची वर्णी लागली आहे. चार विषय समित्यांच्या सभापतीपदी महिलांची निवड झाली आहे.पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. ११ ते १ वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यासाठी वेळ देण्यात आला होता. ९ जणांचे १० नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिंटांचा वेळ देण्यात आला होता. समाजकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसच्या परसुवाले सईदाबी अब्दुल रूऊफ व भाजपच्या रेणुका हनवते यांनी अर्ज केले होते. परंतु, भाजपच्या रेणुका हनवते यांनी अर्ज मागे घेतल्याने परसुवाले सईदाबी अब्दुल रूऊफ यांची बिनविरोध निवड झाल्याचे उपविभागीय अधिकारी नेटके यांनी जाहीर केले. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी तीन अर्ज प्राप्त झाले होते. भाजपच्या रोहिणी बोराडे व शिवसेनेच्या अयोध्या चव्हाण यांनी (२) दोन अर्ज दाखल केले. या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात अयोध्या चव्हाण यांना ३४ तर रोहिणी बोराडे यांना २२ मते मिळाली. पिठासीन अधिकाऱ्यांनी अयोध्या चव्हाण या विजयी झाल्याची घोषणा केली.इतर विषय समित्यांसाठी पाच अर्ज प्राप्त झाले होते. भाजपचे अवधूत खडके, प्रतिभा घनवट, पूजा सपाटे, प्रभा गायकवाड, छाया माने यांच्यापैकी छाया माने, प्रतिभा घनवट यांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अवधूत खडके २२, प्रभा गायकवाड ३४, पूजा सपाटे यांना ३४ मते पडली. पिठासीन अधिकाऱ्यांनी प्रभा गायकवाड व पूजा सपाटे यांच्या विजयाची घोषणा केली. यावेळी पिठासीन अधिकारी केशव नटके, सचिव नामदेव केंद्रे, नायब तहसीलदार घुगे यांच्यासह जि.प. सदस्य व सर्व पंचायत समिती सभापतींची उपस्थिती होती.सभापतीपदाची निवड जाहीर होताच महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आमदार कैलास गोरंट्याल यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. याप्रसंगी महाविकासआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती. दरम्यान या सर्व घडामोंडीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षांनी ओबीसी प्रवर्गाला पद दिल्याने काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेद्र राख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सर्व सदस्य हजर: लोणीकरांनी घेतला आक्षेपअर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यांसाठीचा व्हिप आदेश वाचवून दाखवावा. व त्याची नोंद सभा वृत्तांत घ्यावी, अशी विनंती माजी उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी पिठासीन अधिका-यांना केली.यावर भाजपचे सदस्य राहुल लोणीकर यांनी आक्षेप घेतला. यावेळी पिठासीन अधिका-यांनी सतीश टोपे यांची विनंती मान्य केली. व्हीप वाचून दाखवला व त्याची नोंद सभा वृत्तांत घेतली. या निवडणुकीवेळी जि.प.च्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. तर सभापती गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले आहे.
विषय समित्यांवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 1:00 AM