घनसावंगी : घनसावंगी शहरासह पंचक्रोशीचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान श्री लक्ष्मी-नृसिंह यांचा यात्राेत्सव साधेपणाने शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.
घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी यापूर्वीच श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर संस्थानचे अध्यक्ष व मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कोरोनामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यात्रा समिती व शहरातील काही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव साजरा करण्यात आला. शहरात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.
घनसावंगी येथील श्री नृसिंह देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी यात्रेसाठी तसेच जन्मोत्सवासाठी दरवर्षी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून भाविक येतात. यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी असते. या काळात महिला, नागरिक नऊ दिवसांचा उपवास करतात. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, मागील वर्षीपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने यात्राेत्सव रद्द करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या वर्षी यात्रा उत्सव रद्द झाल्याने भाविक-भक्तांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.