लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लालपरीला दीपावलीच्या कालावधीत चांगले उत्पन्न मिळाले आहे. दिनांक १० ते २३ नोव्हेंबर दरम्यान एस. टी. महामंडळाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यातून महामंडळाला जवळपास ४८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
रोजगाराच्या हेतूने घराबाहेर गेलेल्यांसह नोकरदार मंडळीही दिवाळी सणासाठी गावाकडे येतात. दिवाळी कालावधीत दरवर्षी एस. टी. महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. गतवर्षी महामंडळाला तब्बल पाच कोटी ३० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. याच अनुषंगाने यावर्षीही महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारांमधून उत्कृष्ट नियोजन करून दिनांक १० ते २३ नोव्हेंबर दरम्यान अंबड-सोलापूर, अंबड-कुर्ला, अंबड-भुसावळ, जाफराबाद-कुर्ला, अंबड-नागपूर यासह पुणे मार्गावर जादा बस सोडल्या होत्या. या कालावधीत एकूण १ लाख ४० हजार किलोमीटरचे रनिंग झाले असून, त्यातून महामंडळाला ४८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मिळालेले उत्पन्न कमी असल्याची माहिती देण्यात आली. सन २०१८मध्ये महामंडळाला दीपावली कालावधीत पाच कोटींचे तर २०१९मध्ये पाच कोटी ३० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी परतूर आगारानेही दीपावली कालावधीत चांगले उत्पन्न मिळवले आहे. या आगारातील बसेसचे ३५ हजार किलोमीटर रनिंग झाले असून, त्यातून आगाराला जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
८० टक्के बस वाहतूक पूर्ववत
कोरोनामुळे विस्कळीत झालेली जिल्ह्यातील बस वाहतूक ८० टक्के पूर्ववत झाली आहे. केवळ ग्रामीण भागातील बससेवा पूर्वपदावर आलेली नाही. विविध प्रमुख मार्गांवर धावणारी बससेवा पूर्वपदावर आली असून, या सेवेला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.