जालना : शहरातील कोलू घाणा सहकारी संघ लिमिटेड, जालनाच्या नगर भूमापन क्रमांक १०५९६ वरील ४४१ चौरस जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन परस्पर कब्जा केल्याप्रकरणी येथील तालुका जालना पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सखाराम बाबूराव मिसाळ यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोलू घाणा सहकारी संघाची अधिकृत जमीन संघाचे तत्कालीन सभासद देविदास बालाजी मालोदे यांना संस्थेने किरायाने दिली होती. मात्र, त्यांनी २५ वर्षांपासून भाडे दिले नाही. दरम्यान, ऑक्टोबर २०२० मध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सदर जागेचे परस्पर पीआर कार्ड तयार करून जागेवर कब्जा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सखाराम मिसाळ यांच्या फिर्यादीवरून संशयित देविदास बालाजी मालोदे (मृत), कृष्णा देविदास मालोदे, श्रीराम कृष्णराव मालोदे, प्रल्हाद रामकिसन ससाने, अनिल निवृत्ती वाघमारे, संजय पंढरीनाथ मिसाळ व भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास शेळके अधिक तपास करीत आहेत.