फकिरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : एकेकाळी शेतक-यांसाठी वरदान ठरलेली भूविकास बँक एकमार्चपासून कर्मचारीमुक्त झाली आहे. कर्ज थकबाकीची न झालेली वसुली व शासनाने बँक अवसायनात काढण्याचा घेतलेला निर्णय याचा फटका अनेक कर्मचा-यांना बसला आहे.शेतकºयाना दीर्घकाळ परतफेड कर्ज वाटप करण्याचे काम भुविकास बँकेकडून करण्यात येत होते. मात्र कालांतराने सरकारचे धोरण व कर्जमाफीच्या घोषणा यामुळे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भूविकास बँॅक ) गेल्या दहा वर्षांपासून तोट्यात होती. त्यामुळे शासनाने ही बँक अवसायनात काढली. त्यामुळे बँकने वाटलेले कर्ज फेडण्याकडे शेतक-यांनी पाठ फिरवली. जिल्ह्यातील दोन हजार ९८४ थकबाकीदारांकडे बँकेचे तब्बल ४२ कोटी ७३ लाख आठ हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे. शासनाने २०१४ मध्ये तालुका स्तरावरील बँका बंद करून त्या जिल्हा बँकेशी संलग्न केल्या. कार्यालयांनी खर्च व कर्मचा-यांचा पगार होईल एवढी सुध्दा वसुली होत नसल्यामुळे बँक अडचणीत आल्याने अनेक वर्षांपासून कर्मचा-यांचा पगारसुध्दा मिळाला नाही. त्यामुळे बँकेच्या कर्मचा-यांनी टप्याटप्याने स्वेच्छानिवृत्तीचे धोरण स्वीकारले. २८ फेब्रुवारीला बँकेत कार्यरत ११ अधिकारी व कर्मचा-यांनी निवृत्ती घेतल्यामुळे ही बँक आता कर्मचारीमुक्त झाली आहे़ बँकेच्या थकित कर्जाची वसुली कशी करायची, हा प्रश्न जिल्हाउपनिबंधकांसमोर आहे़
भूविकास बॅँक कर्मचारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 1:32 AM