जालना : घराच्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षकाला चाकू व बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. चोरट्यांनी १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.
जालना शहरातील श्रीकृष्ण रुख्मिणीनगरमधील रूपेश ब्रिजकिशोर जैस्वाल हे कुटुंबासह २८ फेबुवारी रोजी कोल्हापूरला गेले होते. घराच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात होता. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला चाकू व बंदुकीचा धाक दाखवून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील ५० हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र, ३५ हजार रुपये किमतीचे लॉकेट, १५ हजार रुपयांची अंगठी, ४० हजार रुपये रोख, ५ हजार एक पारस धातूची शिवलिंग मूर्ती, ७ हजार रुपये किमतीचे चांदीचे कलश मुद्देमाल लंपास केला.
सुरक्षारक्षकाने याची माहिती दिल्यानंतर, रूपेश जैस्वाल यांनी तत्काळ जालना गाठले. त्यानंतर, या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी रूपेश ब्रिजकिशोर जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक कौठाले, पोउपनि. बोंडले यांच्यासह कर्मचारी अनिल काळे यांनी भेटी दिल्या. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जालना शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोन महिन्यांत शहरात तब्बल ५४ चोऱ्या झाल्या आहेत. चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.