जालना : बोलीभाषा भरपूर असल्या तरी ज्या भाषेमध्ये आपले विचार निःसंकोचपणे व्यक्त करता येतात, ती बोलीभाषा म्हणजे आपली मातृभाषा असते. आपण मराठी भाषिक खूपच भाग्यवंत असून कुसुमाग्रजांसारख्या थोर साहित्यिकाचे साहित्य जगण्याची उमेद जागवून दीपस्तंभाचे कार्य करीत असतात, असे प्रतिपादन कवयित्री संजीवनी तडेगावकर यांनी केले.
जालना येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मराठी भाषेतील निवडक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून सुनील हुसे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विशद केले. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. अनिल बाविस्कर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शंकर पावसर, कुंदन गाडेकर, मिलिंद शिंदे, प्रदीप गाढे आदींनी परिश्रम घेतले.