जालना/वडीगोद्री : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना बळजबरीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर वाद होऊन पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यामुळे भडकलेल्या आंदोलकांनी दगडफेक केली. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत १७ पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह २० आंदोलक जखमी झाले. या घटनेनंतर जमावाने चार बस पेटवल्या.
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. शुक्रवारी प्रशासकीय अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा आंदोलनस्थळी आला. जरांगे यांना उपचारासाठी नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनीही दगडफेक सुरू केली.
शांततेत आंदोलन सुरू होते. आमच्यावर गोळीबार केला. आम्ही काही केलं नाही. माता-भगिनींना धक्का लागू देऊ नका. आम्हाला आरक्षण पाहिजे. आता मरेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. - मनोज जरांगे
परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर उपचार केले जात आहेत. गाेळीबार झालेला नसून, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. - तुषार दोशी, पोलिस अधीक्षक