जालना : जालना येथील महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सचिन तालेवर यांनी दिली. कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
महावितरण कंपनीकडून थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण यांनी दुर्लक्ष केले. शिवाय, रोहित्र बिघाडाचे प्रमाण कमी न करणे, ग्राहकांच्या प्रत्यक्ष मीटर वाचनाप्रमाणे बिलांचे प्रमाण घटणे, वीज वितरण सुव्यवस्था राखण्यात अपयश, महसूल वाढीसाठी प्रयत्न न करणे आदी बाबींमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना त्यांना वारंवार देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पठाण यांचे मुख्यालयाकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिली. त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथील अधीक्षक अभियंता संजय सरग यांची बदली करण्यात आली आहे. सरग यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.