राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा वेळ दिला असून आता दुसरीकडे ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध सुरू झाला आहे. आज ओबीसी समाजाचा जालना येथे मेळावा होणार आहे. यासाठी सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येत आयोजन केले आहे. मेळाव्याआधी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा'; जालन्यात एल्गार सभेसाठी लाखोंची गर्दी
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, आजची सभा महत्वाची आहे. आम्हाला संविधानाने आरक्षण दिले आहे. या आरक्षणाचे संरक्षण आम्हाला करायचे आहे. आज आम्ही आमची भूमिका मांडणार आहे. ३७२ जातीच्या समाजाला घटनेने संरक्षण दिले असून कोणालाही यात धुसफूस करण्याचा अधिकार नाही, असंही विजय वड्डेटीवार म्हणाले.
"दोन समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला हे पाहिलं पाहिजे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही विजय वड्डेटीवार यांनी केली.
आज जालना येथे ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे. जालना मार्ग, पाचोड मार्ग, बीड, घनसावंगी मार्गावरून सकाळी ८ वाजल्यापासून सभास्थळी येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरू झाला होता. कोणी दुचाकीवरून तर कोणी चारचाकी वाहनातून सभेसाठी अंबड शहरात दाखल झाले होते. सभास्थळी विविध गीते गात आरक्षणाचे महत्त्व विषद केले जात आहे. सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या छायाचित्राने वेधले लक्षआरक्षण बचाव एल्गार सभास्थळी येणाऱ्या युवकांच्या हाती स्व. गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र होते.हे छायाचित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. शिवाय एकच पर्व, ओबीसी सर्व यासह इतर घोषवाक्य असलेले फलक हाती घेवून युवक घोषणाबाजी करीत होते.