लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : रेनकोट सोबत नसल्याने आपण पावसात भिजू या भीतीपोटी मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने साडेतीन वाजताच शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.कोकरंबा येथे इयत्ता १ ते ५ वी पर्यंत वर्ग असून, ४१ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एन.व्ही. आघाव यांच्यासह दोन शिक्षकाची शाळेत नियुक्ती आहे. मुख्याध्यापक एन. व्ही आघाव हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथून अपडाऊन करतात.रजा न टाकताच शाळेत गैरहजर राहणे, शाळेच्या वेळेत न येणे इ. तक्रारींमुळे मुख्याध्यापकासह शिक्षक नेहमीच चर्चेत असतात. गुरूवारी दोन्ही शिक्षक तळणी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. यामुळे मुख्याध्यापक आघाव हे एकटेच शाळेत होते. साडेतीन वाजेच्या सुमारास आभाळ दाटून आले आणि रिमझिम पाऊसही सुरु झाला. त्यामुळे लोणार येथे जाण्यास अडचण येईल. त्यातच रेनकोटही घरीच राहिल्याने मुख्याध्यापक आघाव यांनी चार वाजता सुटणारी शाळा साडेतीन वाजताच सोडून दिली.माझा रेनकोट घरी राहिल्याने पावसात घरी जाण्यास अडचण आली असती यामुळे विद्यार्थ्यांना सोडून दिले.- एन.व्ही. आघाव, मुख्याध्यापककारवाई करणारयापूर्वी सुध्दा मुख्याध्यापक एन. व्ही. आघाव हे रजा न टाकताच वैद्यकीय रजेवर गेले होते. याबाबत त्यांना नोटीस पाठविली होती. त्याचा खुलासा अद्यापही आलेला नाही. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच शाळेतून सोडून देणे ही गंभीर बाब आहे. याची चौकशी करुन योग्य कारवाई करण्यात येईल. - एस. यू. वाघ, केंद्रप्रमुख, तळणी
रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:19 AM