लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने थैमान घातले असताना आजपर्यंत कुणालाही तो दिसला नव्हता. परंतु बुधवारी सायंकाळी परिसरातील लोकांना प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन झाले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास राधाकिसन माणिक पवार यांच्या शेतात बिबट्या शेतक-यांच्या नजरेस पडला. त्यांच्या शेतात काम करणारे जयराम चव्हाण बैलगाडी जुंपताना त्यांची नजर ऊसात लपलेल्या बिबट्यावर पडली. त्यांच्यात अन बिबट्यात केवळ दहा फूट अंतर होते. बिबट्याला पाहताच चव्हाण यांनी बाजूला पळ काढला. आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतक-यांनी चव्हाण यांच्याकडे धाव घेतली. आवाजामुळे बिबट्या लगेच उसात शिरला. त्यावेळी विजय चव्हाण यांनी बांधावरील चा-याच्या वल्हाळीईवर चढून पाहिले असता. बिबट्या उसाच्या सरीत दबा धरून बसल्याचे दिसले. चव्हाण व बिबट्याची नजरानजर होताच बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेतली. त्यावेळी प्रसंगावधान ठेऊन चव्हाण यांच्यासह शेतक-यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या उसाच्या शेतात पळाला.अर्ध्या तासाने बिबट्या शेजारच्या शेतात विहिरीजवळ दिसला. संबंधित शेतक-यांच्या सांगण्यावरून बिबट्याच्या अंगावर काळे चट्टे असून त्याच्या शरीराचा काही भाव पिवळसर आहे.या बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील शेतक-यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी असून पाणी देता येत नाही. तसेच शेतीच्या मशागतीला मजूर सुद्धा मिळणे अवघड झाले आहे. यावेळी मोती पवार, नामदेव काळे, अर्जुन काळे, विजय चव्हाण, राहुल पवार, राधाकिशन पवार, प्रशांत खोमणे, ज्ञानेश्वर गावडे, पारसनाथ भवर व आजूबाजूच्या शेतातील शेतकरी घटनास्थळी उपस्थित होते.
बिबट्याचे पुन्हा दर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:05 AM