लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील वालसावंगी शिवारातील गायरान जमिनीवर वन विभागाने मागील आठ दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. मात्र, बिबट्या अजूनही जेरबंद झाला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.२४ मार्च रोजी वालसावंगी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वनपाल संतोष दौडकेसह किशोर निकम, प्रमोद गवळी, सुनील गवळी यांच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने रात्री उशिरा या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता.वन विभागाचे वनरक्षक दिलीप जाधव व इतर कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी रोज सायंकाळी एक कुत्रा पकडून आणतात व पिंजऱ्यात बंद करून ठेवतात.मात्र, गेल्या आठ दिवसांपासून बिबट्या या पिंज-याकडे फिरकलाच नाही. उलट त्याने एक -दोन दिवसांत परिसरातील नागरिकांना दर्शन दिले आहे. यामुळे पारध, पिंपळगाव रेणुकाई, सुंदरवाडी, वढोणा, मेहेगाव, अन्वा, धावडा, कोळेगाव, वरुड, सावंगी अवघडराव आदी गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.या बाबत भोकरदन विभागाचे वनरक्षक दिलीप जाधव म्हणाले, २४ मार्चपासून वनविभाग या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, बिबट्या हाती लागत नाही. आंम्ही दररोज बिबट्याचे आवडते खाद्य असलेला कुत्रा पकडून आणतो व ते रात्रीच्या वेळी पिंज-यात बंद करून ठेवतो व सकाळी येऊन बिबट्या जेरबंद झाला की नाही हे बघतो. मात्र, आठ दिवसांपासून बिबट्या पिंज-याकडे फिरकलाच नाही.
वालसावंगी शिवारात अद्यापही बिबट्याची दहशत कायम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:28 AM