केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बेलोरा शिवारात दोन शेतक-यांना गुरुवारी दुपारी बिबट्या आढळून आला. बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतक-यांनी दुपारीच घर गाठले.सोयगाव देवी येथील पंढरीनाथ सहाणे हे सकाळी ११ वाजेच्या सुमारास वालसा गावाकडे येत होते़ बेलोरा गावाच्या शिवारात देवीदास महाराज मठाजवळील जनावरांच्या गोठ्याजवळ अक्षय वाघ व सहाणे यांनी बिबट्या पाहिला. भयभीत होऊन त्यांनी तेथून काढता पाय घेतला. घडला प्रकार त्यांनी परिसरातील काही शेतक-यांना सांगितला. मात्र बिबट्या कोणत्या दिशेने गेला, याबाबत काहीच माहिती नसल्याने परिसरातील शेतक-यांनी दुपारीच घर गाठले.बेलोरा, वालसा, सोयगाव देवी, वालसा खालसा, बोरगाव तारु, रजाळा, कोपार्डा, मेरखेडा इ. गावांच्या परिसरात बिबट्याची दहशत आहे. वन विभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बेलोरा शिवारात आढळला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:16 AM