लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी शिवारात गुरुवारी अनेक शेतक-यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.१७ जानेवारी रोजी एकलहरा शिवारात बिबट्याने वासराला ठार केले. त्यानंतर आता बिबट्याने रामसगाव रोडवरील जोगलादेवी परिसरात आगमन झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरात उसाची शेती आहे. येथील परमेश्वर गायकवाड, मारोती गायकवाड हे गुरुवारी उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता बिबट्याचा आवाज आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. गुरुवारीच सायंकाळी ५ वाजता गावातील ५०-६० तरूण त्या ठिकाणी गेले असता उसाच्या शेतातून बिबट्याने पळ काढत दुस-या शेतात उडी घेताना दिसल्याचे गजानन खोजे, दत्ता खोजे यांनी पाहिले. सध्या वितरिकांना पाणी सुरू आहे. ऊस, गहू, हरभ-याला पाणी देण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. गावात दहशत असून, वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
जोगलादेवी परिसरात बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:42 AM