लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना लगाम लावण्यासाठी दामिनी पथकाने कारवाईचे सत्र हाती घेतले आहे. मागील पंधरा दिवसात १२ जणांवर कारवाई करून समज देण्यात आली आहे. तर शहरातील चार शाळा, महाविद्यालयातील ७०० वर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत.शहरी, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाºया मुलींची छेडछाड होऊ नये, यासाठी पालकांसह शाळा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येते. पोलीस दलाकडून जनजागृती करण्यासह कारवाई मोहीम राबविली जाते. मात्र, मुलींची छेड काढण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुलींची छेड काढणाºया रोडरोमिओंच्या मुस्क्या आवळण्यासाठी जालना पोलीस दलातील दामिनी पथक कार्यरत आहे. या पथकाने चालू शैक्षणिक वर्षात आजवर जालना शहरातील चार शाळा, महाविद्यालयांसह क्लासेसमध्ये शिकणाºया ७०० वर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. मुलींनी स्वत:चा बचाव करण्यासह कणखर बनावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जालना शहरासह राजूर भागातील बावणे पांगरी येथील १२ रोडरोमिओंवर धडक कारवाई या पथकाने केली असून, त्यांना नियमानुसार नोटीस देऊन समज देण्यात आली आहे. या कारवाईमुळे संबंधित ठिकाणच्या रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहे.दामिनी पथकाकडून शाळा, महाविद्यालयांना अचानक भेटी देणे, मुलींच्या शासकीय, खाजगी वसतिगृहांना भेटी देऊन चर्चा करणे, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही पथकाकडून जनजागृती केली जात आहे. मुलींच्या आडवे येणाऱ्यांना आडवे करण्यासाठी कार्यरत असलेले दामिनी पथकाने शालेय, महाविद्यालयीन काळातील शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षेची तयारी याबाबतही मुलींसह मुलींना मार्गदर्शन केले आहे.केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही या पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, मुलींना कायद्याची माहिती देणे, स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे उपक्रम दामिनी पथकाने हाती घेतले आहेत. शाळा- महाविद्यालय परिसराची पाहणी केल्यानंतर आवश्यक तेथे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याच्या सूचना शाळा, महाविद्यालय प्रशासनाला देण्यात येत आहेत.महिलांनाही देणार माहितीमहिलांना अनेक हक्क कायद्याने मिळाले आहेत. मात्र, अनेक महिलांना कायद्याची माहिती नाही. महिलांना कायद्याची माहिती व्हावी, समाजात वावरताना त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठीही दामिनी पथकाकडून उपक्रम राबविले जाणार आहेत.
७०० शाळकरी मुलींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:19 AM