परतूर : दोन्ही परीक्षा केंद्रांवर नगण्य उपस्थिती
परतूर : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. शहरातील दोन्ही परीक्षा केंद्रांवर २०३ पैकी केवळ ७४ विद्यार्थी शनिवारी उपस्थित राहिले.
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हजेरी लावतात. मागील वर्षी एप्रिल २०२० मध्ये होणारी ही परीक्षा कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. ही परीक्षा शनिवारी शहरातील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय व जिल्हा परिषद प्रशाला या दोन केंद्रांवर ठेवण्यात आली होती. या परीक्षेसाठी परतूर, मंठा व परिसरातील शाळेतील विद्यार्थी येतात.
लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय केंद्रावर १०५ पैकी १७ परीक्षार्थी उपस्थित होते. तर ९८ परीक्षार्थी गैरहजर राहिले. असे एकूण २०३ पैकी ७४ परीक्षार्थीच उपस्थित होते. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून संदीप वाघमारे यांनी काम पाहिले. तर मुख्याध्यापक वसंत सवने यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परीषद प्रशाला केंद्रावर ९८ पैकी ५७ परीक्षार्थी उपस्थित होते. ४१ परीक्षार्थी गैरहजर राहिले. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून सतीश नाईक यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक विष्णूपंत कदम यांनी मार्गदर्शन केले. या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षा समन्वयक स्वप्नील सारडा यांनी सहकार्य केले. एकूणच कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
फोटो ओळ : परतूर शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांची नगण्य उपस्थिती होती.