जालना : जिल्ह्यात गतवर्षीपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. असे असतानाही दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर प्रतिदिन वाढत आहेत. पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून मागील ३० वर्षांत लीटरमागे ८२ रुपयांनी वाढ झाली आहे.
३० वर्षांपूर्वी लोक सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करीत होते. परंतु मागील काही वर्षांपासून प्रत्येक व्यक्ती स्वत:चे वाहन खरेदी करून प्रवास करीत आहे. त्यामुळे पेट्रोलचे दरही वाढत आहेत. १९९१ ला जिल्ह्यात १८ रुपये लीटरप्रमाणे पेट्रोलची विक्री होत होती. २००१ ला यात वाढ होऊन ३१ रुपये लीटरप्रमाणे पेट्रोल मिळत होते. २०११ नंतर सतत पेट्रोलचे दर वाढत आहेत. सध्या कोरोनामुळे हैराण असलेल्या नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत असून, नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
तेलाच्या किमती वाढल्या
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याचा परिणाम व्यवहारावर झाला असून सर्वजण हैराण झाले आहेत. अशा काळातही सतत तेलाचे दर वाढत आहेत. सध्या जिल्ह्यात सूर्यफूल तेल १८० प्रतिलीटरप्रमाणे विकले जात आहे. तर सोयाबीन १६०, करडीचे तेल २०५ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. तेलाचे दर वाढल्याने बजेट कोलमडले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या काळातही महागाई वाढत आहे. पेट्रोल तर १०० रुपये लीटरप्रमाणे विकले जात आहे. त्यामुुळे वाहन विकून सायकलवर फिरण्याची वेळ आली आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवावे.
- युनूस सय्यद, वडीगोद्री
गेल्या काही वर्षांपासून महागाई वाढत आहे. खाद्यतेल, गॅस सिलिंडरबरोबरच आता पेट्रोलच्या दरातही वाढ होत आहे. प्रतिदिन दीडशे रुपये पेट्रोलसाठी खर्च करावे लागत आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवावे.
- गोरखनाथ कोल्हे, धाकलगाव
गेल्या वर्षापासून कोरोनाने हैराण करून सोडले आहे. त्यातच दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने आता पुन्हा सायकलवर फिरावे लागत आहे. शासनाने कोरोनाच्या परिस्थितीत विचार करावा.
- अजय मासोळे, वडीगोद्री