विजय मुंडे
जालना : शेतीत एक ना अनेक प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी पशुधनाच्या पालनावरही भर दिला आहे. दुधाच्या उत्पादनातून दैनंदिन लाखोंची उलाढाल होते. परंतु, या पशुधनावरील लसीकरण असो अथवा इतर आजारांवरील उपचार असोत, ते वेळेवर मिळत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. पशुसंवर्धन विभागातील रिक्तपदांचा अधिक फटका शेतकरी, पशुपालकांना बसत आहे.
पशुधनावर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद पशुधन विभागाचे ५९ दवाखाने आहेत. यात श्रेणी एकचे ३५, फिरता दवाखाना एक, श्रेणी दोनचे २३ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये ८८ पदे मंजूर आहेत. पैकी ६४ भरली असून, २४ पदे रिक्त आहेत. रिक्तपदे पाहता, पशुधन विकास अधिकारी विस्तारची तीन पदे रिक्त आहेत. पशुधन विकास अधिकारी यांची २० पदे रिक्त आहेत. सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांचे एक, पशुधन पर्यवेक्षकांची १०, व्रणोपचारकांची १०, तर परिचरांची २४ पदे रिक्त आहेत. प्रत्यक्षात पशुधनावर उपचार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कामाचा भार पडला आहे. त्यात पशुधनाच्या विविध आजारांवरील उपचार, लसीकरण यासह इतर मोहिमांवर परिणाम होत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने पशुधन दगावण्याची भीती आहे.
कोट
पावसाळ्यात पशुधनाला एक ना अनेक आजार होतात. पशुधन आजारी पडू नये, यासाठी त्यांचे वेळेवर लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु, सध्या पशुधन पर्यवेक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या जनावरांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे जनावरांना आजार होण्याचा धोका आहे.
महेश देशमुख, पशुपालक, पारध बु,
वरूड बु. व परिसरातील अनेक शेतकरी शेतीला पर्याय म्हणून पशुधनाचे पालन करतात. परंतु, पशुवैद्यकीय रुग्णालयातील अपुरे कर्मचारी, असुविधा यामुळे शेतकरी, पशुपालकांची गैरसोय होते. अनेकवेळा खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो.
गजानन बावस्कर, वरूड बु.
पशुधन आजारी पडले, तर शेतकरी, पशुपालकांचे नुकसान होते. विविध कारणांनी शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा खासगी डॉक्टरांकडे जावे लागते. यात वेळ आणि पैसा खर्च होतो.
रामेश्वर लक्कस, शेतकरी, पारध खुर्द
कोट
अहवाल वरिष्ठांकडे
पशुधन विभागातील रिक्तपदांची माहिती वेळोवेळी वरिष्ठांना दिली जाते. ती पदे भरावीत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शिवाय लसीकरणाची मोहीम सुरू असून, पशुधनावर वेळेत उपचार देण्याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
डॉ. डी. एस. कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
रुग्णालयांची स्थिती बिकट
पशुसंवर्धन विभागाच्या जिल्ह्यातील काही रुग्णालयांची स्थितीही बिकट झाली आहे. यात जालना तालुक्यातील कार्ला, पाचनवडगाव, नेर, अंबड तालुक्यातील नालेवाडी, सुखापुरी, एकलहरा, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, पिंपळगाव कोलते, अन्वा, जाफराबाद तालुक्यातील जानेफळ, घनसावंगी तालुक्यातील रांजणी, घनसावंगी, तीर्थपुरी, अंतरवाली टेंभुी, परतूर तालुक्यातील परतूर, सातोना, वाहेगाव, श्रीष्टी, पाटोदा येथील रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. कुठे इमारत खराब झाली आहे. तर कुठे स्वत:ची जागा उपलब्ध नाही.