जालना : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे. रात्री १० वाजता हॉटेल, बीअर बार आणि दारू दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. असे असतानाही जालना शहरासह जिल्हाभरात मध्यरात्रीपर्यंत हॉटेल, बार सुरू ठेवले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिअॅलिटी चेकमधून समोर आले.
कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने नियम आणि अटी घालून हॉटेल, बीअर बार उघडण्यास परवानगी दिली आहे. रात्री १० वाजता हॉटेल, बार, वाइन शॉप, देशी, विदेशी दारू दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. या आदेशाचे पालन केले जाते का? याची ‘लोकमत’ने शनिवारी रात्री पाहणी केली. अंबड चौफुली परिसरात रात्री अकरा वाजेपर्यंत बीअर बार व वाइन शॉप सुरू असल्याचे दिसून आले. शहरातील इतर ठिकाणीही अशीच स्थिती पाहायला मिळाली.
ग्रामीण भागातही असेच चित्र आहे. काही गावांमध्येही सर्रासपणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना, हॉटेल व बार चालकांना साधी विचारपूसही केली जात नाही. काही पोलीस अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अंबड चौफुली परिसरात अकरानंतर सुरूच
जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील हॉटेल व बार रात्री अकरा वाजेनंतरही सुरूच असल्याचे दिसून आले. पेट्रोलिंग करणारे पोलीसही हॉटेल व बाराकडे दुर्लक्ष करीत होते.
औरंगाबाद चौफुली येथेही ‘जैसे थे’
जालना शहरातील औरंगाबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बार व हॉटेल आहेत. येथील हॉटेल व बार चालकही नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
रामनगर परिसर
जालना तालुक्यातील रामनगर परिसरात हॉटेल व बारची संख्या मोठी आहे. येथे तर रात्री एक ते दोन वाजेपर्यंत हॉटेल व बार सुरू असतात.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने नियम व अटींच्या आधारे बीअर बार व वाइन शॉप सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सर्व बीअर बार व वाइन शॉप चालकांनी रात्री दहा वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.
बीअर बार व वाइन शॉपमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल, वाइन शॉप व बीअर बारला रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या हॉटेल, वाइन शॉप व बीअर बार चालकांनी नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही कारवाई करीत आहे.
कदम, अधीक्षक, उत्पादन शुल्क