लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढत आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. असे असताना तळणी परिसरात उन्हाची तमा न बाळगता शेतकरी कुटुंबांकडून अद्रक, हळद काढणीला वेग आला आहे.ग्रामीण भागात शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून अद्रक- हळदीकडे पाहीले जाते. तळणी व परिसरात मागील पाच वर्षांपासून अद्रक व हळद घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत झाल्याने जानेवारीत जलसाठे, विहिरीनी तळ गाठला होता. तरीही पाण्याचे योग्य नियोजन करुन अद्रक व हळद पीक शेतकºयांनी जोपासले. यावर्षी जूनमध्ये हळद- अद्रक लागवड मोठ्या प्रमाणात होणार असल्याने अद्रक - हळदीच्या बियाणाला मोठी मागणी आहे. हळदीच्या बियाणाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. तर अद्रकाला सहा हजारांचा भाव मिळत आहे. शेतकरी अद्रक- हळदीच्या काढणीनंतर बियाणांच्या विक्रीला पसंती देतात. त्यानंतर उरलेल्या हळदीच्या बियाणांना उकडून वाळत घातले जाते. यासाठी खर्च व वेळ वाढतो. वाळलेल्या हळदीला ७ हजार प्रति क्विंटल भाव मिळत आहे.वाशिम, रिसोड , हिंगोली या भागातील व्यापारी हळदीचे कच्चे व वाळलेले बियाणे शेतक-यांकडून खरेदी करीत आहेत.यावर्षी कमी पाणी असतानाही अद्रक व हळदीचे एकरी १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न मिळाले. हळदीसाठी एकरी ४० ते ५० हजाराचा खर्च तर अद्रकाला एकरी १ लाखावर खर्च झाला असून हळदीतून एकरी दीड लाखांपर्यंत उत्पन्न तर अद्रकाचे एकरी ६ लाखांवर मिळाले असल्याचे युवा शेतकरी संजय भाऊराव सरकटे, वामन कुकडे, शिवाजी सरकटे, प्रदीप लाड, प्रकाश सरकटे यांनी सांगितले.
तळणी परिसरात अद्रक, हळद काढणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:54 AM