जालना : काँग्रेसने गेल्या ६० वर्षामध्ये गरीबी हटावचा नारा दिला होता. परंतु, देशातील गरीबी हटण्यापेक्षा ती अधिक वाढली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा गरिबी हटविण्याचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात घेतला आहे. हे म्हणजे, 'मुंगेरीलालके हसीन सपने' असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २) जालना येथे आयोजित सभेत केली.
मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यात आले होते. यावेळी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. संदिपान भुमरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. अतुल सावे, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये शेवटच्या घटकांपर्यंत विकासाच्या योजना पोहचविल्या आहेत. मोदी सरकारच्या काळात दुष्काळासाठी चार हजार ७०० कोटी रूपये मिळाले असून त्यामुळे भरीव मदत झाली आहे.
खोतकर पांडवांच्याच कळपात मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात तेढ निर्माण झाले होते. परंतु, पार्थरूपी उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली. आणि काँग्रेसच्या वाटेवर असलेले खोतकर हे पांडवांच्याच कळपात राहिले असा मिश्किल टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.