जालना : लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजपमधील तिढा सुटला असून, दानवेंशी दोन हात करण्याची डरकाळी फोडणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. असे असले तरी, अद्यापही जालन्यातील दानवेंना काँग्रेसकडून टक्कर कोण देणार? याबाबत उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही. त्यासाठी मोठा खल सुरू आहे.
माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या जालन्यातील निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. त्यावेळी आ. अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह भीमराव डोंगरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अशीच बैठक पुन्हा मंगळवारी रात्री औरंगाबादेत आयोजिण्यात आली होती. या बैठकीस आ. कल्याण काळे यांची विशेष उपस्थिती होती. आ. अब्दुल सत्तार, कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, कल्याण दळे आदींचीही या बैठकीस उपस्थिती होती.
पक्षश्रेष्ठींचे संकेतअशोक चव्हाण यांनी तातडीने उमेदवाराचे नाव पाठविण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता एक तर आ. कल्याण काळे यांनी दानवेंशी दोन हात करण्यासाठी दुसऱ्यांदा तयार व्हावे, अन्यथा आ. अब्दुल सत्तार यांनीही यावेळी लोकसभेच्या मैदानात उतरावे, असे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळत आहेत. त्यामुळे आ. सत्तार किंवा आ. काळे या दोघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.