मुंबई - शिवसेना-भाजपा युती जाहीर होऊन दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडून शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत आहेत. मात्र लोकसभा मतदारसंघाच्या काही जागांवरुन अद्यापही युतीत अजूनही चर्चा सुरु आहे. त्यातील सर्वाधिक चर्चा होतेय ती म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघाबाबत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. मात्र याच मतदारसंघासाठी शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरलेला आहे. मात्र दानवे यांचा बालेकिल्ला भाजप सोडण्यास तयार नाही. पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांची मनधरणी केल्याची माहिती आहे.
औंरंगाबादमध्ये आज शिवसेना-भाजचा संयुक्त मेळावा होणार आहे. मात्र त्याआधी शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडेल. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं यावर अर्जुन खोतकर यांचे लक्ष आहे. खोतकर माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असली तरी रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक सोपी नसणार आहे.
रावसाहेब दानवेंनी सत्ताकाळात खोट्या केसेस कार्यकर्त्यांवर टाकल्या आहेत त्यामुळे खोतकर आणि शिवसैनिक नाराज आहेत. बैठकीनंतर अर्जुन खोतकर यांनी माघार जरी घेतली तरी कार्यकर्त्यांच्या मनातील सल दूर करणे नेतृत्वाला कठीण आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक रावसाहेब दानवेंसाठी जड जाणार हे मानलं जातंय.
याआधी खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे, अजूनही युतीच्या जागा वाटपात कोणताही निर्णय झाला नाही. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहे असं भाष्य केलं होतं. त्याचसोबत काँग्रेसमध्ये अर्जुन खोतकर प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरु होती. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनीही लवकरच गुड न्यूज कळेल असं पत्रकारांना सांगितल्यामुळे खोतकर काँग्रेसच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढवतील असं बोललं जातं होत.