जालना : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरत मंगळवारी दुपारी शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षभरापासून अर्जन खोतकर आणि खा. रावसाहेब दानवे यांच्यामध्ये याना- त्या कारणावरून वाद होत आहेत. तसेच खोतकर यांनी सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहिर केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी १० दिवसांपूर्वी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मध्यस्ती करण्यासाठी खोतकरांच्या निवासस्थानी पाठविले होते. त्यानंतर खोतकर - दानवेंमध्ये मनोमिलन झाले की, काय अशी चर्चा सुरू होती.
परंतु, जालन्यातील लोखंडी पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी पुन्हा खोतकर यांनी लोकसभेच्या रिंगणात असल्याचे जाहिर केल्याने खोतकर- दानवेंमधिल वाद पुन्हा समोर आला आहे.यामुळेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे खोतकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.