लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला खरीप पिकांचा घास वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजामधून चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस आहे. पिंपळगाव रेणुकाई, पारध, खुर्द, पारध बु, वालसांवगी, धावडा, जळगाव सपकाळ, आन्वा, दानापूर, शेलुद, वडोद तांगडा, हिसोडा, आडगाव, मोहळाई, अवघडराव सावंगी, आन्वा, वाकडी या गावांच्या परिसरात सोयाबीन, मका, मिरची, बाजरी, भुईमुग इ. पीके चांगली बहरून आली होती. यामुळे तीन वर्षांच्या दुष्काळाची भरपाई या खरीप हंगामात होईल, या आशेवर शेतकरी होते. पीके सुध्दा नजर लागेल अशीच आली आहेत. नेमकी ही पीके सद्यस्थितीत काढणीला आली असून, परतीच्या पावसाने या भागात कहर केला आहे. त्यामुळे सोयाबीन, मिरची, मका, ही पीके अतिवृष्टीमुळे हातची जाण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन या पीकाची सोंगणी केली आहे. त्याच बरोबर मका सुध्दा तोडली. मात्र, हे पीके जमीनीवर पडलेली असतानाच या पावसामुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ या पावसाचा सर्वात मोठा फटका धावडा, पिंपळगाव रेणुकाई, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, वालसावंगी, अवघडराव सांवगी या भागात बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत असताना यंदा शेतक-याच्या तोंडी आलेला घास या पावसामुळे वाया जाण्याच्या भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.या भागातील शेतक-यांनी यंदा मोठ्या प्रमाणात खर्च करून कपाशीवरील रोगराईवर नियंत्रण मिळविले आहे. सद्य:स्थितीत कपाशीला मोठ्या प्रमाणात पाती लागले आहेत; परंतु पावसामुळे पातीगळ सुरू असल्याने कपाशीचे पीक केवळ वाढले आहे. यंदा कपाशीच्या उत्पन्नात घट होते की, काय? अशीही भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.
खरीप पिकांचे नुकसान; बळीराजा हवालदिल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:37 AM