लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील बस आगाराला यावर्षी मार्च अखेर १९ लाखांचा तोटा आला असून, मार्ग तपासणी पथकाचे दुर्लक्ष व अवैध प्रवासी वाहतुकीने या आगाराचे उत्पन्न बुडाल्याचे दिसून येत आहे. भरारी पथकाने योग्य वेळी अवैध वाहतूक बंद केली असती तर तोट्यात जाणारे हे आगार निश्चितच फायद्यात राहिले असते, असा सूर प्रवाशांतून उमटत आहे.परतूरच्या आगारातील समस्यां कडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. बस, चालक, वाहक यांची कमतरता. इतर अडचणींना तोंड देत या आगाराचा कारभार सुरू आहे. यावर्षी या आगाराचे उत्पन्न ३४ कोटी ७० लाख एवढे झाले. मात्र खर्च यापेक्षा अधिक झाला आहे. प्रती कि़ मी. उत्पन्न २३. ७२ रू. तर ३५.७१ रू. खर्च आहे. त्यामुळे मार्च अखेर हे आगार १९ लाख ४ हजार रू. तोट्यात आहे. या आगाराच्या उत्पन्न वाढीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. या आगारातून धावणाऱ्या बसेसची तपासणी मार्ग तपासणी पथकाकडून काटेकोरपणे होत नाही. ही तपासणी कधीतरी होत असल्याने फुकट्या प्रवाशांचे फावते. त्यामुळे ही तपासणी सातत्याने होत राहिल्यास मोठा फरक पडू शकतो. तसेच तालुक्यातील सर्वच मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. बसच्या वेळात व याच बसच्या थांब्यावर ही अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने बसचे प्रवासी आपल्या वाहनात क्षमतेच्या तिप्पट बसवून वाहने चालवतात. यातच परतूर शहरातील मु्ख्य रोडचे काम, भूमिगत गटार योजना तसचे शहराबाहेर सुरू असलेले दिंडी मार्गाचे काम यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. बसलाच थांबायला जागा नाही. थांबे व वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या आगराच्या उत्पन्न वाढीसाठी मार्ग तपासणी पथक, पोलीस, महामंडळाचे भरारी पथकाने संयुक्त कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
परतूर आगाराला वर्षात १९ लाखांचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:46 AM