जालना : प्रियकर पैशाची मागणी पूर्ण करत नसल्याने अंगणवाडी सेविका असलेल्या एका महिलेने विषप्रयोग करून प्रियकराला मारण्याच्या प्रयत्न केला. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच पाण्यात उंदीर मारण्याचे औषध मिसळून प्रियकरास पिण्यास दिले. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रमेश नाथाराम घुगे (३५, रा. लोधी मोहल्ला) याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादित त्याने म्हटले की, आपला मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शहरातील शिवनगर भागातील एका अंगणवाडी सेविका महिलेसोबत आपले मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. या महिलेच्या घरी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंसह अन्य सामान आपण खरेदी करून देत आलो आहे. गत दीड वर्षात प्रेयसीने आपल्याला मानसिक त्रास देऊन पाच लाख रुपये घेतले आहेत. दिवाळीच्या दिवशी प्रेयसीच्या एका नातेवाईकाने फोन करून सीडीपीओ जागेच्या प्रमोशनसाठी तुझ्या प्रेयसीला दहा लाख रुपयांची गरज असून, हे पैसे तू तिला दिल्यास यापुढे काहीच त्रास होणार नाही, असे सांगितले. दि. ६ रोजी प्रेयसीने आपल्याला फोन करून घरी बोलावले. त्यामुळे आपण मंडप डेकोरेशनचे काम पाहणाऱ्या एका मुलाला घेऊन प्रेयसीच्या शिवनगर येथील घरी गेलो. सोबत आलेला मुलगा बाहेरच थांबला. घरात गेल्यानंतर प्रेयसीने आपल्याकडे सीडीपीओ पदाच्या प्रमोशनसाठी हव्या असलेल्या दहा लाख रुपयांची मागणी केली.
तुला पैसे हवे आहेत की, मी हवी आहे, असे म्हणून स्वयंपाकघरातून आणलेले एक ग्लास पाणी आपल्या तोंडाला लावून पाजले. पाणी पिल्यानंतर आपल्याला उलट्या होऊ लागल्या. उलट्या करण्यासाठी बेसीनजवळ गेल्यानंतर तिथे उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे औषध दिसले. त्यामुळे मला शंका आली. प्रेयसीनेच आपल्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदीर मारण्याचे औषध पाण्यात टाकून पाजल्याचे लक्षात आले. जास्त उलट्या होऊ लागल्यामुळे प्रेयसीने आपल्यासोबत आलेल्या कामावरील मुलाला बोलावून घेत, हा माझ्या काहीच कामाचा नाही, असे सांगून त्याला येथून घेऊन जाण्यास सांगितले. कामावरील मुलाने आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आपण बेशुद्ध पडलो, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, मंठा चौफुली येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दि. ७ रोजी शुद्धीवर आल्यानंतर रमेश घुगे याने प्रेयसी महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे. उपनिरीक्षक इंगळे अधिक तपास करत आहेत.