जालना : प्रेमाला वय, जात, धर्म, गरीब, श्रीमंत अशी कुठलीच बंधने नसतात. मात्र, शंका, गैरसमज, संशयातून प्रेमाची जागा टोकाच्या द्वेषाने घेतल्याची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षांत समोर आली आहे. ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, त्यालाच संपविण्याची मानसिकता बनत चालली आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत तब्बल २३ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात चारित्र्याच्या संशयावरून पाच जणांचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.
प्रेमात सुरुवातीला सोबतच जगायचे अन् सोबतच मरायचे, असे वचन एकमेकांना दिले जाते. परंतु, याच नात्यात दरी निर्माण झाल्यावर एकमेकांचा जीव घ्यायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. काहीवेळा आत्महत्येसारख्या घटनांनी प्रेमाचा शेवट झाल्याचे पाहावयास मिळाले तर, कधी-कधी हत्येचा थरार देखील झालेला आहे. काही वेळा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला संपविले जाते. काही वेळा प्रियकराचा काटा काढला जातो, तर पत्नी आणि प्रियकर मिळून पतीचा काटा काढतात. गेल्या चार महिन्यांत जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुनाच्या घटना घडल्या आहेत. जवळपास २३ खून झाले आहेत. यात पाच खून हे चारित्र्याच्या संशयावरून झाल्याचे समोर आले आहे. त्यातच गेल्या सात दिवसांत तब्बल चार खून झाले आहेत. यामुळे जिल्हा हादरला आहे.
गेल्या दीड वर्षभरात प्रेमासाठी घडलेल्या घटना१) अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाचा खून आईनेच तिच्या प्रियकरासह अन्य एकाच्या मदतीने केला. चिमुकल्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून आणि गळा चिरून खून करण्यात आला होता. ही घटना अंबड तालुक्यातील डावरगाव येथे घडली होती. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. प्रेमामुळे आपल्या मुलाचा आईने जीव घेतला होता.२) कुंभारपिंपळगाव येथील एका तरुणीने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.३) पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रोहिदास लक्ष्मण खरात (४०) यांचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे दोन महिन्यांपूर्वी घडली होती.४) चारित्र्यावर संशय घेत पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून माय-लेकीचा खून केल्याची घटना जालना शहरातील सोनलनगर परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. भारती गणेश ऊर्फ संजू सातारे, वर्षा सातारे अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.