वडीगोद्री : रेशीम कोषाचे घसरलेले दर, बाजारातील अनिश्चितता, या सोबतच रेशीम शेतीसाठी शासनाचे मिळणारे अनुदानही न मिळाल्याने अत्यंत कष्टाने पिकवलेले दोन एकरांतील तुतीचे पीकही जेसीबीने उपटून टाकण्याची वेळ वडीगोद्री (ता. अंबड) येथील चंद्रकांत खमीतकर यांच्यावर आली आहे.
वडीगोद्रीतील रेशीम उत्पादक शेतकरी चंद्रकांत खमीतकर यांनी अंतरवाली सराटी शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये २ एकर क्षेत्रावर मागील दोन वर्षांपूर्वी तुतीची लागवड केली होती. शेड उभारणीसाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. शिवाय तुती लागवड, मेहनत, मशागत व मजुरीचा असा एकूण दीड लाख रुपये खर्च झाला. पहिल्या वर्षी झाडे लहान असल्याने जेमतेमच उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी तुतीचे झाडे जोमदार व बहारदार आली असताना खमीतकर यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या बहारदार पिकास कोरोनारूपी संकटाची दृष्ट लागली. यात चंद्रकांत खमीतकर यांच्या अपेक्षांचा चक्काचूर झाल्याने त्यांनी तुतीची झाडे मोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापूवीर्ही गावातील मुकुंद सुरासे, जगन्नाथ सुरासे व संजय गावडे या शेतकऱ्याने तुतीची शेती मोडून टाकली आहे. मागील आठ महिन्यांपासून बाजारात रेशीम कोषाचे दर घसरले आहेत. मागील वर्षी ५५० रुपये किलो दराने विकला जाणारा रेशीम कोषाचे दर या हंगामात १६० रुपये किलो नीचांकी दराने विकला जात आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. यातच मागील दोन वर्षांत शासनाचे एक रुपयाचे अनुदानही न मिळाल्याने शेतकऱ्यांना तुतीची झाडे मोडून टाकावी लागत आहेत.
लॉकडाऊनमुळे नुकसान कोरोनामुळे मध्यंतरी लागलेल्या टाळेबंदीमुळे रेशीम कोष मातीमोल किमतीत विक्री करावे लागले. कडक लॉकडाऊन काळात अंडीपुंज न मिळल्याने तीन महिने तुतीचा पाला कापून शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. रेशीम उत्पादक चंद्रकांत खमीतकर यांना वेळेवर अंडी पुंज मिळाले असते तर किमान ३ ते ४ क्विंटल रेशीम कोषाचे उत्पादन त्यांना मिळाले असते; परंतु लॉकडाऊनमुळे ही अंडी पुंज त्यांना मिळाली नसल्याने त्यांचे सुमारे १ लाख २५ हजार ते २ लाखांचे नुकसान झाले होते.
शासन अनुदानही नाही मागील वर्षी दुष्काळात व आता अतिवृष्टीतही अत्यंत कष्टाने रेशीम शेती केली होती; परंतु आता रेशीम कोषाचे दर कमी झाल्याने रेशीम शेती परवडत नाही. तसेच अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शासनाचे आजवर एक रुपयाचेही अनुदान मिळाले नाही. यातच अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यात बळीराजा भरडला जात आहे.- चंद्रकांत खमीतकर, रेशीम उत्पादक, वडीगोद्री