बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विवाहाचा अधिकृत शासकीय पुरावा म्हणून आवश्यक विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत नवदांम्पत्यांची भूमिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे. महिन्याकाठी शेकडो शुभमंगल लागत असताना नगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागात केवळ शंभर नवदाम्पत्यांनी नोंदणी केली आहेविवाहाचा कायदेशीर पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय पती-पत्नीचे संयुक्त बँक खाते उघडणे, विमा पॉलिसी, पासपोर्ट काढणे, वारसा हक्क दावा, आंतरजातीय विवाह झाल्यास आदी शासकीय कामांसाठी विवाह नोंदणी प्रमाणत्र आवश्यक असते. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र मिळविता येते. मात्र, विवाह नोंदणीबाबत बहुतांश नवदाम्पत्य अनभिज्ञ आहेत. याबाबत जनजागृती नसल्याने विवाह नोंदणी करावी लागते याबाबत अनेकांना माहिती नसल्याचे चित्र आहे. जालना नगरपालिका कार्यालयात विवाह नोंदणी स्वतंत्र विभाग आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नवदांम्पत्यांना तात्काळ नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, येथे नोंदणीसाठी येणाऱ्या दाम्पत्यांचे प्रमाण नगण्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, हे प्रमाण अत्यंत कमी आहे. जालना शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाल्यामुळे विवाह नोंदणी करणाºयांच्या संख्येत भर पडेल, असे सूत्रांनी सांगितले.
विवाह नोंदणीकडे नवदाम्पत्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:05 AM