लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/हिसोडा : भोकरदन तालुक्यातील हिसोडा खुर्द येथे पोळा सणातील पूजेचा मान मिळविण्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढून वादावर पडदा टाकण्यात येत आहे. यंदाही अशाच पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आला. यात नाना कौतिकराव जगताप या शेतकऱ्याला पूजेचा मान मिळाला.हिसोडा गावात यापूर्वी पाहुण्या घरातल्या बैलाला पोळ्यातील पुजेचा बहुमान होता. त्यावेळी पाहुण्यांना मान कशाला असे म्हणत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मारोती संस्थान समितीने मान मिळविण्यासाठी हरास पध्दत सुरू केली. हरासात जो जास्त बोली लावत त्याला मान मिळत. गत दोन वर्षांपूर्वी ज्याकडे पैसा आहे, त्यालाच मान का ? असा प्रश्न उपस्थित झाल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ‘लकी ड्रॉ’ मधून पुजेचा मानकरी ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.हिसोडा या गावात ५०० च्या जवळपास बैलाची संख्या आहे. शुक्रवारी आपल्या बैलाला पोळ्याचा मान मिळावा यासाठी २० शेतकऱ्यांनी २०० रुपयांच्या प्रत्येकी पावत्या फाडल्या होत्या. त्यानंतर सर्व गावक-या समोर हनुमान मंदिरात मुलाच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली.यात नाना कौतिकराव जगताप या शेतक-याच्या बाजूने ईश्वर चिठ्ठीने निर्णय दिला. कुंडलिक जाधव यांनी या बैलाची पूजा करून पुरणपोळी खाऊ घातली व त्यानतंर पोळा हा सण शांतेत वाजत-गाजत साजरा केला. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लकी ड्रॉ’ काढून हिसोडा येथील ग्रामस्थांनी सोडविला पोळा सणाच्या पूजेचा वाद..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:02 AM