- संजय देशमुख जालना : जालना जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांची घोषणा आता जवळपास निश्चित झाली. युतीकडून कुठलाच उमेदवार बदलण्याची हिंमत दाखवली नसल्याने युतीच्या डावात जुनेच पत्ते असे याचे विश्लेषण करता येईल. गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते, विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती नव्हती. केवळ घनसावंगी मतदारसंघातून आ. राजेश टोपे यांनी घडाळ्याची टिकटिक कायम ठेवली होती.
जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यात आजघडीला जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या रूपाने एकमेव आमदार आहेत, तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, हे परतूर विधानसभेचे नेतृत्व करतात. बदनापूर हा राखीव मतदारसंघ असून, त्यातून भाजपचे आ. नारायण कुचे तर भोकरदन मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे आमदार आहेत. एकूणच तीन भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे गेल्या निवडणुकीतील चित्र आहे. यंदा भाजपने आपली यादी जाहीर करताना ती सर्वात शेवटी केली आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जालना आणि घनसावंगी येथील उमेदवारांना खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ए.बी. अर्ज दिले होते.
दरम्यान, पुन्हा एकदा जुन्याच लढती कायम राहतील असे चित्र दिसत आहे. जालन्यात काँग्रेसकडून माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्याविरूध्द खोतकर, परतूरमध्ये लोणीकरांविरूध्द माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भोकरदनमध्ये भाजपचे संतोष दानवेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. चंद्रकांत दानवे तसेच घनसांवगी मतदारसंघात आ. राजेश टोपे यांच्याविरूध्द शिवसेनेकडून निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. हिकमत उढाण यांच्यात लढत होईल. बदनापूर मतदारसंघात आ. कुचेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागून आहे. बदनापूर मतदारसंघ शिवसेनेकडे सोडावा, या मागणीसाठी माजी आ. संतोष दानवे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हट्ट धरला होता आणि ठाकरे यांनीही बराच उचलून धरला परंतु ऐनवेळी यात बदल शक्य झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता संतोष सांबरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदा वंचित, एमआयएमकडे लक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार किती प्रभाव पाडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. वंचित आघाडीने आपले पाचही उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच जालन्यातील एमआयएमचे उमेदवारही यापूर्वीच घोषित केले आहेत. त्यामुळे प्रचारातील रंगत आता चांगली वाढणार आहे.