Maharashtra Election 2019 : जालन्यात आघाडी- युतीत सरळ लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:47 PM2019-10-08T17:47:22+5:302019-10-08T17:58:17+5:30
पाचही मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना-भाजप महायुतीमध्ये थेट लढत
- संजय देशमुख
जालना : जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना-भाजप महायुतीमध्ये थेट लढतीचे चित्र स्पष्ट आहे. बदनापूर मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज परत घेतल्याने जिल्ह्यात प्रमुख पक्षांविरुद्ध बंडखोरीचा झेंडा राहिला नाही.
जालना मतदारसंघात ५६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २४ जणांनी माघार घेतली तर ३२ उमेदवार रिंंगणात राहिले आहेत. परतूर मतदारसंघात २१ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७ जणांनी माघार घेतली असून, ३२ उमेदवार रिंंगणात राहिले आहेत. घनसावंगी मतदारसंघात २७ अर्ज आले होते. पैकी १४ जणांनी माघार घेतली असून, १३ उमेदवार रिंंगणात राहिले आहेत. भोकरदन मतदारसंघात ९ अर्ज दाखल झाले होते. पैकी ३ जणांनी माघार घेतली असून, ६ उमेदवार निवडणूक रिंंगणात राहिले आहेत. बदनापूरमध्ये २० अर्ज दाखल झाले होते. तर ६ जणांनी माघार घेतली असून, १४ उमेदवार निवडणूक रिंंगणात उतरले आहेत.
बदनापूरमध्ये भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांच्या विरोधात शिवसेनेचे जालन्यातील नगरसेवक बाबू पवार आणि शिवसेना दलित आघाडीचे अध्यक्ष अॅड. भास्कर मगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, या दोघांनी उमेदवारी मागे घेतल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली. जालना मतदारसंघात आता पुन्हा परंपरागत लढत होणार आहे. त्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यात सरळ लढत होईल. येथे एमआयएमचे माजी नगराध्यक्ष इकबाल पाशा रिंंगणात असून, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. अशोक खरात हेही नशीब अजमावत आहेत. ते मतदारांवर किती प्रभाव पाडतात, हे आगामी काळात दिसून येईल. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती होती, ती आता नाही.
भोकरदन मतदारसंघात भाजपचे संतोष दानवे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होईल. येथे वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोराडे निवडणूक लढवीत आहेत. बदनापूर मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे यांच्याविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी यांच्यात सामना होईल. येथे वंचित बहुजन आघाडीचे राजन मगरे हे निवडणूक लढवीत आहेत.
लोणीकर-जेथलिया यांची परतूरमध्ये लढत
परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्यात थेट लढत आहे. येथे वंचित बहुजन आघाडीचे शिवाजी सवने हे रिंंगणात आहेत.
घनसावंगीत उढाण, टोपे यांच्यात सामना
घनसावंगीत शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांच्यात सरळ सामना होईल. येथे वंचित बहुजन आघाडीचे विष्णू शेळके हे आखाड्यात आहेत.
मनसेचे दोघे रिंगणात
जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बदनापूरमधून राजेंद्र भोसले तर परतूर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळुंके हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.