जालना : जालन्यातील एकेकाळची अत्यंत मोठी कंपनी म्हणून झलानी टूल्स पूर्वीची गेडोर कंपनीतील कामगार राधेश्याम शर्मा यांची मुलगी सरिता शर्मा-खंदारे या कामगार नेत्या म्हणून उदयास आल्या आणि जालना जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी उडी घेतली. जिल्ह्यातील एकमेव महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांच्या प्रचाराकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रचारादरम्यान त्या रोजगार हमीचे कामे तसेच शेतात जावून निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.
जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. परंतु परतूर मतदार संघातून सरिता शर्मा यांचा अपवाद वगळता एकही महिला रिंगणात नाही. शर्मा यांचे वडील ज्या कंपनीत होते.ती कंपनी बंद पडल्यानंतर त्या कामगारांचे आतोनात हाल सुरु होते. घरातूनच कामगारांविषयीची आस्था त्यांना मिळाल्याने तरुण वयात त्यांनी माकप पक्षात सहभाग घेतला. पक्षातील एक ओघवते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या सरिता शर्मा यांनी विविध आघाड्यांवर लढा दिला. शर्मा यांचा विवाह याच पक्षात कार्यरत असलेले मारुती खंदारे यांच्या सोबत झाला. त्यामुळे लग्नानंतर त्या सरिता शर्मा -खंदारे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी परतूर मतदार संघातून उमेदवारी दाखल केली. त्यावेळीपासूनच त्यांच्याडे सर्वांचे लक्ष लागून होते. परतूर मतदार संघात जवळपास २३८ गावे असून आतापर्यंत त्यांनी १४० पेक्षा अधिक गावामध्ये भेटी देवून विशेष करुन महिलांशी संपर्क साधला. त्यावेळी अत्यंत विदारक चित्र त्यांना दिसून आल्याचे त्या म्हणाल्या, सरकार एकीकडे स्वच्छतेवर भर देत असून, १२ हजारांचे अनुदान शोचालय बांधणीसाठी देत आहेत. परंतु अनेक गावांमध्ये आज पाणीच नसल्याने ही शौचालय शोभेची वस्तू बनली आहेत. रोजगार हमी योजनेची मजुरी बाजारात देण्यात येणाऱ्या मजुरीपेक्षा कमी असल्याने अडचणी आहेत. तर महिलांच्या आरोग्या संदर्भातील अडचणी सांगण्यासाठी अनेक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातील महिला आजही अनेक आजार अंगावर काढतात. कुपोषणाचा मुद्दाही या मतदार संघात गंभीर असल्याचे दिसून आले.
कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीतइतर बडया राजकीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे प्रचाराचा थाट-माट नसला तरी ज्या गावात जाऊ तेथे आमचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. शेतकरी कर्जमाफी, पीकविमा आदी गंभीर मुद्दे आजही लालफितीत आहेत. धूरमुक्त गावाचे स्वप्न केवळ सरकारच्या जाहिरातीतूनच दिसून येत असल्याचे वास्तव प्रत्यक्ष प्रचाराला गेल्यावर दिसून येते. आमच्या पक्षाचा अंजेडा गोरगरिबांचे कल्याण आणि कामगारांचे हित याला महत्व दिले. त्यामुळे पती मारोती खंदारे यांच्यासह हाडाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या सोबत प्रचारात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.