जालना : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे. ही निवडणूक दोघांनी प्रतिष्ठेची केली आहे.
महाविद्यालयीन निवडणूकांपासून खोतकर आणि गोरंट्याल हे एकमेकांसमोर आले आहेत. नगर परिषदेच्या राजकारणातून गोरंट्याल सक्रीय झाले तर अत्यंत तरुण वयात शिवसेनेशी खोतकर यांची नाळ जुळली. या दोघांमध्ये १९९९, २००४, २०१४ अशा लढती झाल्या आहेत. त्यात दोन वेळेस गोरंट्याल यांनी बाजी मारली तर चार वेळेस अर्जुन खोतकर यांनी विजय मिळविला आहे.
जालन्यात व्यापार आणि उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने उद्योजक आणि व्यापारी तसेच ग्रामीण भाग ज्याच्या पाठीशी तोच निवडणूकीत विजयी होतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे. जालन्यातील नागरी समस्या, शिक्षण, रोजगारांच्या संधी हे प्रश्न आजही कायम आहेत. पालिका ताब्यात असल्याने गोरंट्याल यांनी निकष डावलून कामे केल्याचा मुद्दा खोतकरांनी प्रतिष्ठेचा केला आहे.
शिवसेनेत राहूनही अत्यंत मृदू स्वभावाचे म्हणून ओळख असलेले खोतकर हे नेहमीच सामान्यांच्या सुख-दुखात आवर्जून सहभाग घेतात. वाणीत साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून राजकारण करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.कुठल्याही परिस्थितीत हिंमत न हारता ते समोरच्याशी दोन हात करतात. राजकारण करताना कोणाचे मन दुखवणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेत असतात. राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने आपोआपच त्यांची पावले सक्रिय राजकारणाकडे वळली आहेत. काँग्रेस पक्ष संकटात असलातरी त्यांनी कधीही निष्ठा सोडली नाही. पालिकेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाल्याने त्यांना शहरातील समस्याची जाण आहे. यातूनच पाणीपुरवठा योजना पूर्णत्वासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. गेल्या दहा वर्षांपासून जालना पालिकेवर काँग्रेसचा एकछत्री अंमल आहे.