जालना/मुंबई - ज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे. मात्र आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, असे म्हणत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणाला विरोध दर्शवला. तसेच, तू माझ्या शेपटीवर पाय ठेऊ नको, असा इशाराही जरांगे पाटील यांना दिला. अंबड येथील ओबीसी, भटके आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील यांच्या उपोषणाची खिल्ली उडवत भुजबळ यांनी जरांगेंवर बोचरी टीका केली.
सारखं खातो खातो करतोय, कुणाचं खातोय, तुझं खातोय का?. कष्टाचं खातो, सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांच्यावर बाोचरी टीका केली. तसेच, उपोषणाच्या मुद्द्यावरुन त्यांची खिल्लीही उडवली. आजपासून पाणी घेणार नाही, मग कोणीतरी साधू महाराज येतात, त्यांच्या शब्द ठेवण्यासाठी पाणी पितो. आता, यापुढे पाणीसुद्धा घेणार नाही, मग महाराज येतात, महाराजांना नकार देता येणार नाही, म्हणून पाणी पितो. आता, पाणी पिणार नाही. त्यानंतर, न्यायमूर्ती येतात, मग आंदोलन संपतं, असा घटनाक्रम सांगात भुजबळांनी जरांगेंची खिल्ली उडवली.
जरांगेंना आरक्षणातील काहीच कळत नाही, आणि याला सांगायला न्यायमूर्ती सर सर.. करतात. हे पाचवी शिकलंय का माहिती नाही. पण, याला समजावून सांगायला न्यायमूर्ती आले होते, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटना आणि नेतेमंडळींच्या घरांवरील हल्ल्यालाही जरांगे पाटील यांनाच भुजबळांनी दोषी धरलं. तसेच, मी म्हणेल तसेच, नेत्यांना गावात बंदी, कुणीही इकडं यायचं नाही. अरे ही काय हुकूमशाही आहे का. इथं लोकशाही आहे. महाराष्ट्रात फिरू देणार नाही. म्हणजे, महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिलाय का रे?, असे म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. तसेच, पोलिसांना तात्काळ गावागावात लावण्यात आलेले बोर्ड काढावेत, असा इशाराही दिला.
आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाही
आरक्षण काही गरीब हटावचा कार्यक्रम नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणासाठी राज्यात ५८ मोर्चे निघाले आम्ही विरोध केला नाही. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे यासाठी आपण सर्वप्रथम पाठींबा दिला. मात्र आम्ही कुणाची घर जाळली नाही. आज काही आमदार कार्यकर्त्यांनी तर विरोधात भूमिका घेतलीच नाही तरी त्यांची घरे जाळली. कायद्याने आरक्षणाला आमचा विरोध नाही. मागच्या दाराने घुसण्याचा प्रयत्न करू नये. उपोषण सुरु असतांना पोलिसांनी विनंती केली. त्यांची विनंती समजून न घेता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ७० हून अधिक पोलीस जखमी झाले. मात्र एकच बाजू सगळीकडे दाखविण्यात आली. ते पोलीस काय पाय घसरून पडले काय ? असा सवाल उपस्थित करून ज्या महिला पोलिसांवर हल्ला झाला त्यांच्यावर जी परिस्थिती आली त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली.