लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील आझाद मैदानावर १९ ते २३ डिसेंबर दरम्यान ६२ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जवळपास ९०० पहेलवान आणि अन्य तांत्रिक अधिकारी, कर्मचारी आणि पदाकारी मिळून एक हजार २०० जणांची उपस्थिती राहणार आहे. गादी आणि माती गटात ही स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आणि जालना जिल्हा कुस्तीगिर परिषदेचे जिल्हाध्यक्ष पहेलवान दयानंद भक्त यांनी गुरूवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेच्या शुभारंभासाठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द सिने अभित्यांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ संघ सहभागी होणार आहेत.या सर्व निमंत्रितांची निवास आणि भोजनासाची व्यवस्था पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब मिळविलेल्या विजेत्यास दोन लाख रूपये आणि चांदीची गदा देण्यात येते.उपविजेत्यास एक लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येते. त्या बक्षिसााच्या रकमेतही वाढ करण्याचा विचार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली.स्पर्धेच्या सांगतेसाठी महाराष्ट्र कुस्तीगिर स्पर्धेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले. ही कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आझाद मैदानावर होणाऱ्या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे दोन मैदानांची उभारणी करण्यात आली असून, ५० हजार नागरिकांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, अभिमन्यू खोतकर, भरत सुपारकर, गणेश सुपारकर आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 1:00 AM