जालना : गोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे. गेल्या साडेचार वर्षात या योजनेंतर्गत ३९ हजार ५५३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे. त्यापोटी शासनाने ९५ कोटी ७६ लाख ७२ हजार १८३ रुपयांचा खर्च केला आहेत.
दारिद्रयेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबास आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यात आली होती. दरम्यान, या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. या योजनेतंर्गत ९७१ आजारांवर उपचार करण्यात येतात. यातील १३२ आजारांवर शासकिय रुग्णालयातच उपचार केले जाऊ शकते.
या योजनेमुळे गोरगरीब दारिद्रयेरेषेखालील व अर्थिक मागासलेल्या कुटुंबातील रुग्णांना दीड लाखांपर्यत मोफत उपचार करण्यात येतात. तसेच मूत्रपिंडावरील आजारावर अडीच लाखापर्यंत आरोग्य सेवा दिली जाते. या योजनेत जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह पाच रुग्णालय येतात. या योजनेमुळे अनेक रूग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, हृदयरोगासह अन्य गंभीर आजारासाठी ही योजना गोरगरिबांसाठी संजीवनी ठरत आहे.अन्य जिल्ह्यांतही घेतले उपचार
जिल्ह्यातील ३९ हजार ५५३ रुणांपैकी १५ हजार ३७२ रुग्णांनी योजने अतंर्गत परजिल्ह्यात उपचार घेतले. यातील २४ हजार १८१ रुग्णांनी जिल्हयात उपचार घेतले. या योजनेमुळे अनेक गोर गरिबांचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी रूग्णालयातच स्वतंत्र माहितीकक्षही स्थापन करण्यात आला आहे.