लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील एका शेतकऱ्याने नऊ वर्षांपूर्वी कृषीपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. मात्र, अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. असे असले तरी या शेतकºयास वीजवितरण कंपनीने तब्बल ४८ हजार २९० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. त्यामुळे महावितरणचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.वाढीव मीटर रीडिंग आधारे बिल आकारणे, चुकीचे वीज बिल पाठवणे, बिलच न पाठवणे, वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकाला वारंवार चकरा मारायला लावणे, अशा कारणांमुळे वीज ग्राहकांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागला आहे. असाच प्रकार आता दोदडगाव येथील शेतकरी धोंडीराम लहानू पांढरे यांच्यासोबत घडला आहे. पांढरे यांची दोदडगाव गट क्रमांक ७३ मध्ये सव्वा पाच एकर शेती आहे. विहिरीवरील कृषीपंपास वीज जोडणी मिळविण्यासाठी २८ एप्रिल २००९ मध्ये विद्युत विभागाच्या अंबड उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी चार हजार ८०० रुपयाचे कोटेशनही भरले होते. मात्र, नऊ वर्षे प्रतीक्षा करूनही त्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे पांढरे यांनी विहिरीवर डिझेलपंप बसवून शेतीसाठीच्या पाण्याची गरज भागवली. २००९ मध्ये भरलेल्या कोटेशनवर आता वीज जोडणी मिळणार नाही. त्यासाठी नव्याने कोटेशन भरावे लागेल, असे महावितरण कर्मचाºयांनी सांगितल्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांनी पत्नी जिजाबाई पांढरे यांच्या नावाने सहा हजार ३०० रुपयांचे दुसरे कोटेशन भरले. दोन्ही कोटेशन भरल्याच्या पावत्या अधिकाºयांना वारंवार दाखवूनही त्यांना अद्यापही जोडणी मिळालेली नाही. केवळ ४८ हजारांचे वीज बिल देण्यात आल्यामुळे पांढरे यांना धक्का बसला आहे.
महावितरणचा चमत्कार; जोडणी नसलेल्यास ४८ हजारांचे बिल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:42 AM