जालना : तोडलेले वीजकनेक्शन जोडून देण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह कंत्राटी टेक्निशियनवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सकाळी राणीउंचेगाव येथील महाराष्ट्र बँकेसमोर करण्यात आली.
वरिष्ठ तंत्रज्ञ सुरेश प्रकाश गुंजाळ (रा. दह्याळ ता.अंबड), बालाजी भिकाजी शिंगटे (रा.राणीउंचेगाव ता.घनसावंगी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराचे मागील पाच महिन्यांपासून वीजबिल थकले होते. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ गुंजाळ यांच्याकडे वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांना तीन हजार रूपये लाचेची मागणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने जालना येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पथकाने सोमवारी राणीउंचेगाव येथे सापळा रचला. वरिष्ठ तंत्रज्ञ गुंजाळ यानी तक्रारदाराकडे तीन हजार लाचेची मागणी केली. तसेच मागणीनुसार कंत्राटी टेक्नेशियन बालाजी शिंगटे यांनी महाराष्ट्र बँकेसमोर तीन हजार रूपये तक्रारदाराकडून घेतले. लाचेची रक्कम घेताच पथकाने कारवाई केली. एसीबी'च्या पथकाने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचा 'झटका' दिल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
यांनी केली कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप अटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर, अंमलदार ज्ञानेश्वर म्हस्के, गणेश बुजाडे, जावेद शेख, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गजानन कांबळे, चालक प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.