जालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिंदेसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्यात ऐन लोकसभा निवडणुकीत गत काही दिवसांपासून वैचारिक मतभेद दिसत आहेत. याची प्रचिती रविवारी जालना शहरात आयोजित ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमात पुन्हा आली. एकाच कार्यक्रमात हजर असताना या दोन्ही नेत्यांत अबोला राहिल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.
२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्याने खोतकर यांनी माघार घेतली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत खोतकर यांचा पराभव झाला आणि खोतकर-दानवे यांच्यातील वैचारिक मतभेद वाढले. याची प्रचिती वेळोवेळी आली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर मित्रपक्षाचा मेळावा झाला आणि दानवे यांना पाच लाखांची लीड देण्याची घोषणा मित्रपक्षातील नेत्यांनी केली. त्यावेळी खोतकर यांनीही युती धर्म पाळत दानवे यांना लीड देऊ, असा दावा केला होता. दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही खोतकर यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली. परंतु, नंतरच्या कार्यक्रमात खोतकर यांनी दूर राहणे पसंत केले. भाजपकडून मान मिळत नसल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. खोतकर यांनीही योग्य ठिकाणी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले होते. त्यामुळे खोतकर हे नाराज असल्याची चर्चाही महायुतीच्या मित्रपक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. त्यात भर पडली ती खोतकर यांनी दानवे यांच्या अर्ज भरण्याच्या आणि प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला मारलेल्या दांडीमुळे ! खोतकर कधी प्रचारात उतरणार याची उत्सुकता मित्रपक्षातील पदाधिकारी विशेषतः भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होती. त्यात खोतकर आणि दानवे हे रविवारी जालना येथे आयोजित ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमात हजर होते. परंतु, त्यांनी एकमेकांशी अबोला ठेवल्याने महायुतीच्या पदाधिकार- कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.
शिवसैनिकही शांतउपनेते अर्जुन खोतकर हेच प्रचाराच्या मैदानात उतरलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकही प्रचारात दिसत नाहीत. लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे खोतकरांची नाराजी दूर होणार केव्हा आणि त्यासाठी पुढाकार घेणार कोण यावरही आता महायुती विशेषत: भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत चर्चा सुरू आहे.