माहोरा : येथील मागासवर्गीय वस्ती व परिसरातील पाच सिंगलफेज डीपी जळाल्या आहेत. त्यामुळे या भागात दोन महिन्यांपासून अंधार पसरला असून, विजेअभावी एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी महािवतरणच्या कार्यालयात धाव घेवून अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांचा भडीमार केला.
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये वीजपुरवठा करणारे पाच डीपी जळाले आहेत. त्यामुळे गावातील भोरखेडा रोड, बसस्टॅन्ड विभाग, वडाळा रोड, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, मागासवर्गीय वस्ती परिसरात दोन महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विजेअभावी मुलांच्या अभ्यासावरपरिणाम होत आहे. डीपी दुरूस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वेळोवेळी या भागातील नागरिकांमधून केली जात होती. परंतु, महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विजेचा प्रश्न तातडीने मिटविला नाही तर महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंदना पवार , भास्कार सोनवने आदींनी दिला. यावेळी वीज कर्मचारी बावस्कर, गजानन जाधव यांनी महिलांची समजूत काढून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. रवींद्र कासोद, संतोष गौरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हले यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.
कोट
ग्रामपंचायतीचे महावितरण कंपनीला सतत सहकार्य राहत आहे. त्यामुळे महावितरणने गावातील मागासवर्गीय वस्तीतील वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी डॉ. रवींद्र कासोद यांनी केली आहे.
माहोरा गावातील जळालेल्या डीपी त्वरित दुरूस्त करून गावातील वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडविला जाईल. तसेच ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा केला जाईल.
सुदर्शन लोढा, उपकार्यकारी अभियंता, जाफराबाद