फकीरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील हुतात्मा स्मारकाची शासनाने ११ लाख रूपयांचा निधी देऊन हे स्मारक चकचकीत केले आहे. या ठिकाणी स्मारकाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक होणे आवश्यक आहे़पिपळगाव कोलते या गावाने हैदराबादमुक्ती संग्राम लढ्यामध्ये सहभाग घेऊन मोठी कामगिरी केली होती त्यामध्ये २० जून १९४८ रोजी गावातील दाजीबा तात्याबा म्हस्के, पांडुरंग योगीराज बिनोरकर, दगडुगीरी बुलाबगीरी गोसावी, व केशवराव परसराम कोलते या थोर वीरांनी आपले बलिदान दिले होते. त्याच प्रमाणे या गावापासून तीन ते चार कि़मी. अंतरावर असलेल्या धानोरा गावातही काही थोर वीरांनी आपले बलिदान दिले होते. त्याचे कायम स्मरण रहावे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री कै.बॅ़ए़ आऱ अंतुले यांनी तालुक्यातील या दोन्ही गावामध्ये हुतात्मा स्मारकाची उभारले होते. जेव्हा पासून ही स्मारके उभारण्यात आली होती. तेव्हा पासुन ही स्मारके दुर्लक्षीत झाली होती. त्यांनतर गेल्या काही आठ दहा वर्षापुर्वी धानोरा हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री या तालुक्यात समाविष्ट करण्यात आल्यामुळे भोकरदन तालुक्यात केवळ पिंपळगाव कोलते येथील एकमेव स्मारक राहिले होते. या स्मारकाची झालेली दयनिय आवस्था झाली होती. मात्र, त्यानंतर पिंपळगाव कोलते येथील ग्रामस्थ, ग्रामपंचयत, यांनी लोकप्रतिनिधी व शासणाकडे स्मारकाची दुरूस्ती होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्यशासणाने या स्मारकाच्या दुरूस्तीसाठी गेल्या आठ महिन्यापुर्वी ११ लाख रूपयाचा निधी दिला होता त्या निधीतून या हुतात्मा स्मारकाची टिनपत्रे, फरशी, खिडक्या, दरवाजे, यांची दुरूस्ती करण्यात आली शिवाय प्लास्टर करण्यात आले व स्थंभाची दुरूस्ती करून दोन महिन्यापुर्वी या हुतात्मा स्मारक व स्थंभाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे स्मारक डौलाने उभे आहे.