लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह जिल्ह्यात रविवारी मकर संक्रांत उत्साहात साजरी झाली. तीळ गूळ घ्या..गोड गोड बोला म्हणत लहान-मोठ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वाण देण्यासाठी महिलांची मंदिरात गर्दी पाहायला मिळाली.मकर संक्रांतीच्या सणाचे महिलांना विशेष आकर्षण असते. त्यामुळे महिलांची सकाळपासून लगबग पाहायला मिळाली. कुठे घरासमोर सडा रांगोळीची गडबड, तर कुठे पूरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी. बाजारातही वाणाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. शहरातील बहुतांश मंदिरात महिलांनी दुपारनंतर महिलांनी वाण देण्यासाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. जुना जालना भागातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात समोर महिलांची लांबच लांब रांग पहायला मिळाली.काळुंका माता, मंमादेवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर या ठिकाणी महिलांची वाण देण्यासाठी गर्दी दिसून आली. नवीन जालन्यातील पंचमुखी महादेवी मंदिर, राममंदिरातही महिलांनी गर्दी केली होती. महिलांनी सुगडे पूजन करून एकमेकींना वाण देऊन तीळगूळ दिले.दिवसभर तीळगूळ वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. मित्र, मैत्रिणी तसेच आप्तेष्टांना तीळगूळ देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. शहरासह जिल्ह्यात या सणाचा उत्साह होता.
तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:22 AM