जालना : भारत कृषीप्रधान देश असल्याने या संस्कृतीतले अनेक सण, ऋतू आणि शेतीशी निगडित आहेत आणि त्यामुळेच की काय, इतर कोणत्याही धर्मांपेक्षा हिंदू धर्मात अनेक सण आहेत. संक्रांत ही ऋतूची कूसपालट आहे. हिवाळा संपतोय आणि हळूहळू उबदार आणि गी्रष्मात रणरणता होणारा उन्हाळा सुरू होणारा तो हा दिवस.शेतातली हिरवीगार पिके आता सोन पिवळी होणार. नंतर शेतात खळी सुरू होणार. त्या पिकांच्यासाठी आवश्यक असणारी ही कूसपालट आणि म्हणून संपूर्ण देशभरात हा सण साजरा होतो. पंजाबात तर आता धान्य तयार झाल. ‘लोहोडी’ (संक्रांतीचं पंजाबी नाव) मध्ये फेर धरून धान्य अग्नीत नैवेद्य स्वरूप टाकलं जात. तर दक्षिण भारतात ‘पोंगल’ या नावानं हा सण साजरा होतो.आज सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून ‘मकर संक्रांतही’ म्हटले जाते. तसेच साधारणपणे दक्षिणेच्या बाजूने उगवणारा व मावळणारा सूर्य हळूहळू उत्तरेच्या बाजूने उगवायला व मावळायला सुरूवात होते. पौष शुक्ल सहा हा संक्रांतीचा संस्कृत दिवस. मकर संक्रांत ही तीन दिवसांत साजरी होते. भोगी, संक्रांत आणि किक्रांत किंवा करी दिन असे तीन दिवस. संक्रासुर हा असुर खूप उन्मत्त झाला होता आणि म्हणून संक्रांती देवीने त्याचा आजच्या दिवशी वध केला, अशी आख्यायिका आहे.
मकर संक्रांत हा ऋतूची कूस बदलणारा सण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:49 AM