राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, पूर, कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे आणि ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचा थोडा उशिरा शुभारंभ याचा विचार करून खरीप हंगामाची पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आलेला आहे.
जालना जिल्ह्यात मागील दीड महिन्यात फक्त ६० हजार ५४० शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा पीकपेरा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने २४ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम स्वरूपात जिल्ह्यात दोन लाख ८६ हजार २०० शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठीची जबाबदारी ही त्या - त्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
त्यासाठी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन करून ही मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी त्यांनी प्रत्येक गावासाठी उद्दिष्टानुसार कमी, अधिक प्रमाणात स्वयंसेवकांची संख्या निश्चित करणे, त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत असलेले भ्रमणध्वनी ॲपद्वारा मोबाईल ॲप गाव न. नंबर १२ मध्ये नोंदविण्याबाबत प्रोत्साहित करून ही ई-पीक पाहणी यशस्वी करणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे.
जिल्ह्यात एकूण ९५४ गावे ऑनलाईन असून, प्रत्येक गावातील किमान ३०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी नमूद केले आहे.