जालना : आॅनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्हे जनजागृतीबाबत माध्यम प्रतिनिधींसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात मंगळवारी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक लता फड, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक भूषण मेटकर, संगणक तज्ज्ञ रोहित पिपरिये, गणेश देशपांडे, सायबर विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांची प्रमुख उपस्थिती होती.पोकळे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. सर्वसामान्य व्यक्तींना विविध प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विश्वास न बसणा-या जाहिरातींना बळी पडता डिजिटल व्यवहारात होणा-या फसवणुकीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. सोशल मीडिया वापरताना त्याचा दुरुपयोग होणार नाही, तसेच मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याची शिकार होणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अपर पोलीस अधीक्षक फड म्हणाल्या की, आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. डिजिटल व्यवहार व सोशल मिडियापासून आता आपण दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक विचार करून यापासून आपण सुरक्षित कसे राहू, याबाबत काळजी घ्यावी. व्यवस्थापक मेटकर यांनी आॅनलाईन बँकिंग, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, ओटीपी, पासवर्ड सुरक्षा, आॅनलाईन खरेदी व्यवहार करताना होणारी फसवणूक, यापासून सुरक्षा म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. ई-मेल तसेच अँड्रॉईड मोबाईलवर विविध प्रलोभने देणारे मेसेज येत असतात. हा फिशिंगचा प्रकार असून, प्रलोभने दाखविणाºया ई-मेल्सला प्रतिसाद देणे टाळावे, असे सांगितले. संगणक तज्ज्ञ रोहित पिपरिये यांनी संगणक तसेच मोबाईलमधील डेटा कशा प्रकारे चोरी केला जातो, त्याला कसा प्रतिबंध घालावा, याबाबत माहिती दिली. पोलीस दलाच्या आयबाईकचे गणेश देशपांडे यांनी सायबर गुन्ह्यांची कलमे व शिक्षा याबाबत माहिती दिली. यावेळी डिजिटल व्यवहाराबाबत उपस्थितांच्या अडचणी व शंकांचे निरसनही करण्यात आले. सायबर विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांनी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये डिजिटल व्यवहाराबाबत माध्यमांनी अधिकाधिक जनजागृती करावी, असे आवाहन केले.
आॅनलाईन व्यवहार सावधपणे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:52 AM